खाऊगल्ली | उन्हाळ्यात दूध कधी फ्रेजमध्ये ठेवायला विसरले तर ते फाटते.असे दूध फेकून दिले जाते, ते फेकण्यापेक्षा त्याची सुंदर अशी मिठाई बनवता येऊ शकते. फाटलेल्या दुधापासून कलाकंद बनवता येतो.याचीच कृती आपण पाहूया.
साहित्य-
१. फाटलेले दूध १ लिटर
२. लिंबू रस
३. दूध ४ वाट्या
४. साखर अर्धी वाटी
५. दूध पावडर ४ चमचे
६ पिस्ता, बदामाचे तुकडे
कृती-
फाटलेले दूध गरम करत ठेवावे, त्यात लिंबाचा रस घालावं. दूध उकळल्यावर गॅस बंद करावा. लिंबाचा रस टाकल्याने दूध आणि पाणी वेगळे होते. थंड झाल्यावर ते एका सुती कापडात गाळून घ्यावे. पाणी फेकून द्यावे कापडात राहिलेल्या दुधाच्या गोळ्यातील पाणी पिळून काढावे. ते चुरून सुट्टे करून घ्यावे, सुट्टे केल्यावर ते दाणेदार दिसेल.
आता एका कढईत ४ वाट्या दूध गरम करत ठेवावे.दूध थोडे आटल्यावर त्यात दूध पावडर टाकावी. नंतर साखर ( आवडीप्रमाणे कमी- जास्त ) घालून चांगले हलवावे. त्यात फाटलेल्या दुधाचा गोळा टाकून चांगले आटवावे. घट्ट झाल्यावर एका भांड्यात कडून त्यावर पिस्ता आणि बदामाचे तुकडे टाकावे. थंड झाल्यावर याच्या वड्या पाडाव्या. तयार आहे फाटलेल्या दुधाचे कलाकंद.
( टीप – घरात दूध पावडर नसेल तर दुधाचे प्रमाण वाढवावे. )