नवी दिल्ली । आजकाल आपल्या वॉलेटचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. आता वॉलेटमध्ये पैशांऐवजी प्लास्टिकचे कार्ड्स भरले जातात. यामध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे ओळखपत्र, मेट्रो कार्ड यांचा समावेश आहे. कॅशलेस पेमेंटच्या या काळात क्रेडीट कार्ड ही गरज बनली आहे. अनेक लोकं वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड्स घेत असतात. आता प्रश्न असा पडतो की, खरोखरच एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्सची गरज आहे का आणि एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स असण्याचा काही फायदा आहे का?
फायनान्स कन्सल्टंट्स म्हणतात की,”क्रेडिट कार्ड्स तुम्हाला कर्जाच्या दलदलीत ढकलण्याचे काम करतात आणि एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड्स तुम्हाला अशा कर्जाच्या सापळ्यात अडकवतील की त्यातून तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. म्हणूनच अगदी गरजेच्या वेळीच क्रेडिट कार्ड्सचा वापर केला पाहिजे. तसेच त्याचा वापर केल्यानंतर त्याचे बिल भरण्याची व्यवस्था करावी. नाहीतर क्रेडिट कार्डचे व्याज सावकाराच्या व्याजापेक्षा कमी बसत नाही.
क्रेडिट कार्ड्सचा फायदा
जर तुम्ही क्रेडीट कार्ड्स हुशारीने वापरत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. क्रेडिट कार्ड्ससह, तुम्ही अनेक दिवस व्याजाशिवाय पैसे वापरू शकता. तुमच्या खिशात पैसे नसले तरीही तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकता. क्रेडिट कार्ड्सच्या मदतीने तुम्ही 50 दिवसांसाठी व्याजफ्री क्रेडिट खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही महिन्याच्या 1 तारखेला क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली तर तुम्हाला त्याचे बिल भरण्यासाठी 50 दिवस मिळतात. त्यानंतर तुम्ही पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत बिल भरा. क्रेडिट कार्ड्सचे बिल देखील वेळेवर भरणे हे केव्हाही शहाणपणाचे ठरते.
जर तुम्ही बिलिंगच्या तारखेपासून उशीरा पैसे भरले तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल.
क्रेडिट कार्ड्सचे रोलओव्हर टाळा
जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड्सचे बिल पेमेंटच्या तारखेनंतर भरत असाल तर लक्षात घ्या की तुम्ही चूक करत आहात. जर तुम्ही पेमेंटच्या तारखेला बिल भरले नाही, तर तुम्हाला क्रेडिट कार्ड्सची थकबाकी भरण्यासाठी जास्त व्याजासह दंड भरावा लागेल.
क्रेडिट कार्ड्सची बिले पुढील महिन्यापर्यंत वाढवली किंवा गुंडाळली गेली तर टॅक्सफ्री कर्जाचा लाभ मिळत नाही. आता या कर्जावर भरघोस व्याज भरावे लागणार आहे. काहीवेळा अशी वेळ येते की तुमच्याकडे संपूर्ण बिल भरण्यासाठी पैसे नसतात, तेव्हा तुम्ही बिलाच्या किमान 5% रक्कम भरू शकता.
अशा स्थितीत तुमचे उर्वरित बिल पुढील महिन्याचे होते आणि या थकबाकीवर 2-3 टक्के व्याज आकारले जाते आणि जर अशा परिस्थितीत तुम्हाला पुन्हा क्रेडिट कार्डने खरेदी करावी लागत असेल, तर समजून घ्या की नुकसान खूप होणार आहे.
दुसरे कार्ड वापरा
या परिस्थितीत, जर तुमच्याकडे इतर कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही ते नवीन खरेदीसाठी वापरू शकता. मात्र तुम्हाला दोन्ही बिले लवकरात लवकर भरण्याची व्यवस्था करावी लागेल. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही एका कार्डवर न भरलेल्या बिलांवर जास्त व्याज टाळू शकता. कार्ड जारी करणारी बँक तुम्हाला प्रलंबित बिलांची रक्कम कार्डमध्ये ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. काही बँका या सेवेसाठी पहिले 1-2 महिने काहीही फी आकारत नाहीत.
संकटाच्या वेळी मदत करा
तुमच्या कार्डमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किंवा त्या बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुम्ही क्रेडिटसह पैसे भरू शकत नाही, असे अनेकदा घडते. कधीकधी POS मशीन तुमचे कार्ड रीड करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या खिशात ठेवलेले दुसरे क्रेडिट कार्ड कामी येते.