पैशांची कमतरता भासू नये यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पासोबत ‘अशा’ प्रकारे करा तुमचेही आर्थिक नियोजन

नवी दिल्ली । केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पाला अवघे काही दिवसच उरले आहेत. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराच्या आर्थिक व्यवहारांचा आणि योजनांचा लेखाजोखा. तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचे आहे. आणि यासाठी सरकारप्रमाणेच सामान्य माणसानेही आपला बजट बनवणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या बजटमध्ये भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी काय आवश्यक आहे, यावर आपण आज भाष्य करूया

बजट तयार करा
कोणतेही घर नीट चालवायचे असेल तर घराचा सर्व खर्च आणि उत्पन्न याबाबतचे उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे. या बजटच्या उत्पन्नामध्ये पगाराचे उत्पन्न, मालमत्तेतून भाड्याचे उत्पन्न, पोटगीची रक्कम, कोणत्याही योजनेवर मिळणारे व्याज इत्यादींचा समावेश होतो. कौटुंबिक अर्थसंकल्पातील खर्चामध्ये कर्ज, कर्जावरील व्याज, मासिक घरखर्च, मुलांचे शिक्षण इत्यादी आणि वैद्यकीय खर्चाचा समावेश होतो.

कर्जमुक्ती
तणावमुक्त जीवनासाठी कोणत्याही प्रकारच्या कर्जापासून मुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी कोणत्याही परिस्थितीत कर्ज न घेणे आवश्यक आहे आणि जर कर्ज आधीच चालू असेल तर ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्रेडिट कार्डची बिले आधी भरा. कारण, क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर भरपूर व्याज आकारले जाते. तसेच कॅशद्वारे खरेदी करा.

एमर्जन्सी फंड
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी एमर्जन्सी फंड असणे अत्यंत आवश्यक आहे. एमर्जन्सी फंड किमान सहा महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा असावा. एमर्जन्सी फंड असल्यास अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल. हा एमर्जन्सी फंड नोकरी किंवा व्यवसाय गमावणे, वैद्यकीय आणीबाणी इत्यादीसारख्या अचानक उदभवलेल्या परिस्थितीत मोठी मदत देतो.

आरोग्य विम्याकडे लक्ष द्या
आरोग्य विमा हा कुटुंबासाठी मोठा आधार आहे. औषध आणि उपचारांचा वाढता खर्च केवळ आरोग्य विम्याच्या मदतीने भागवला जाऊ शकतो. विमा ही अशी योजना आहे ज्याचा फायदा तुमच्याकडे पैसे नसताना आणि तुम्हाला त्याची खूप गरज भासत असताना मिळतो.