कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील म्हावशी येथील मणदुरे फाट्यानजीक जमिनीच्या वादातून डॉक्टरला मारहाण करून जखमी केले. या मारहाण प्रकरणी दोघांविरोधात पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. महेश विष्णू घाडगे (वय- 36) असे जमखीचे नाव आहे. तर रामचंद्र शामराव घाडगे व अमर घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्हावशी येथील डॉ. महेश घाडगे यांचा मणदुरे फाट्यानजीक सकस शॉपीशेजारी दवाखाना आहे. सोमवार दि. 14 रोजी दुपारी 12 वाजता ते स्वतःच्या खाजगी जागेचा मोजणीचा आराखडा तयार करून घेत होते.
त्यावेळी त्यांचे चुलते रामचंद्र शामराव घाडगे हे त्याठिकाणी आले. तुझी येथे जागा नाही असे म्हणत दोघांच्यात वादा झाला. यावेळी रामचंद्र घाडगे यांनी स्वतःचा मुलगा अमर घाडगे याला फोनवरून बोलावून घेतले. दोघांनी संगनमताने डॉ. महेश घाडगे व त्यांचे वडील विष्णू घाडगे यांना मारहाण केली. यात डॉ. महेश घाडगे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेतील डॉ. महेश घाडगे यांना त्यांच्या वडीलांनी तात्काळ पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतची फिर्याद डॉ. महेश घाडगे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार संतोष कोळी करत आहेत.