अमरावती प्रतिनिधी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सुखकर झाल्या आहे. अगदी घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या माध्यमातून हवे ते ऑनलाईन मागवता येते. तसेच मागविलेली गोष्ट सध्या कुठं आहे यावरसुद्धा लक्ष तसेच चौकशीकरता येते. मात्र, अशाच एका प्रयत्नात एका डॉक्टर महिलेची दिड लाखाची फसगत झाली आहे.
डॉ. प्रवीणा घनश्याम व्यास (वय ३५) मेहरबाबा कॉलनी अमरावती येथील रहिवाशी आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. प्रवीणा व्यास यांनी डी.टी.डी.सी. कुरिअरद्वारे एक पार्सल मागविले होते. बऱ्याच दिवसांपासून हे पार्सल पेडिंग होते. सदर पार्सलबाबत संपर्क करण्यासाठी महिला डॉक्टरने आधी कस्टमर केअरचे नंबर गुगल वेबसाइट वरून मिळवले. त्यावरून संपर्कसुद्धा साधला. ७३६४०६९७८३ क्रमांकांच्या मोबाईल धारकाने महिला डॉक्टरसोबत त्याबाबत चर्चा केली. पार्सल प्राप्त करण्यासाठी मोबाईल धारकाने महिला डॉक्टरच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून, त्यावरून संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
.
महिलेने याबाबत आपल्या पतीला कळविले सोबतच तिला आलेली ऑनलाईन लिंक पतीला पाठविली. पतीने पत्नीने पाठविलेली लिंक फॉलो केली असता, काही मिनिटांतच त्यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख ४९ हजार ९९७ रुपये एवढी रक्कम दुसऱ्याच्या खात्यावर वळती झाली. आपली फसवणूक झाले असल्याचे समजताच याप्रकरणी महिला डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला, पोलिसांनी संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.