औरंगाबाद । कोरोनाबाधित महिलेला डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हि घटना घडली आहे. सदर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात शिरून डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. महिलेला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगरापालिका आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील पदमपुरा येथील कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली होती. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. मंगळवारी रात्री दोन वाजता डॉक्टरने या महिलेकडून शरीर सुखाची मागणी केली. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध करत आरडाओरड केली. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
दरम्यान, याबाबत महिलेच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात शिरून त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. बुधवारी झालेला प्रकार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना कळला. त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल गुरुवारी सकाळपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेकडून डॉक्टरची हकालपट्टी केल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाटणकर यांनी दिली आहे.