बुलडाणा प्रतिनिधी । लहान मुलांना हातात येईल ती वस्तू तोंडात घालण्याची निसर्गतः सवय असते. पण ही सवय कधी कधी खूप महागात पडते. असाच एक प्रसंग शेगावात एका दोन वर्षाच्या बाळावर आला. या मुलाच्या हातात घरात पडलेला स्क्रू आला आणि त्याने तो तोंडात घालून गिळला. त्रास होऊन बाळ रडू लागले. सुदैवाने आईच्या लक्षात ही बाब आल्यामुळे तिने त्वरित डॉक्टरांकडे धाव घेतली. तपासणीअंती गिळलेला हा स्क्रू पोटात न जाता तो श्वासनलिकेद्वारे नाकाकडे वरील दिशेने जाऊन नलिकेत आडवा झाला. मात्र डॉक्टरांनी अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर कुठलीही शस्त्रक्रिया न करता शरीरात शिरलेला स्क्रू बाहेर काढला.
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात प्रकाश चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये अकोल्याच्या डोंगरगाव येथील सर्वेश धुरळकर या २ वर्षीय बालकाला स्क्रू गिळल्यामुळे ऍडमिट करण्यात आलं होतं. २ इंची स्क्रू घश्यात जाताच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्याने आईवडिलांनी त्याला तात्काळ चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील बालरोग तज्ञ डॉ सचिन सांगळे यांनी बाळाची स्थिती पाहून तात्काळ एक्स-रे करून घेतला. श्वासनलिकेत हा खिळा गेल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ५०० प्रकरणांमधून एक प्रकरण अशाप्रकारे समोर येतं असं डॉक्टरांनी सांगितलं.
बालकाला होणारा रक्तस्त्राव पाहता डॉक्टरांनी त्याला अकोला येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवून तेथे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. बाळाच्या आई-वडिलांची आर्थिक स्थितीही हलाखीची असल्याने आई-वडिलांनी डॉक्टर प्रकाश सांगळे यांनाच देव मानून आपणच बाळावर जमतील ते उपचार करावे अशी विनवणी केली. यानंतर डॉक्टरांनी कुठलीही शस्त्रक्रिया न करता एका पाईपने श्वासनलिकेत अडकलेला स्क्रू ढकलत ढकलत घशापर्यंत नेला. सदर स्क्रू घशाजवळ पोहोचताच तोंडातून बाहेर काढण्यात आला. ऐकण्यास सोपा वाटणारा हा प्रसंग प्रात्यक्षिक करताना अंगावर काटा आणणारा असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान या अपघातातून सर्वेश सुखरुप बचावल्याने त्याच्या आई वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. डॉक्टर सचिन सांगळे यांचं त्यांच्या कार्यतत्परतेमुळे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.