हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अरण्यानंद साहित्य व संस्कृती प्रतिष्ठानच्या अरण्यानंद इंग्लिश कॅफेचे उदघाटन डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी केलं. लोकल टू ग्लोबल इंग्लिश कनेक्ट हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी हा उपक्रम अरण्यानंद तर्फे सुरू करण्यात आला आहे. नेपाळमधील काठमांडू विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या डॉ. ईक प्रसाद दुवादी यांनी यावेळी इंग्रजी बोलताना, शिकताना चुका होणारच, त्या चुकांमधूनच इंग्रजी शिकता येईल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं. चुकांमधूनच आपल्यामध्ये इंग्रजी वापरण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो असं ते पुढे बोलताना म्हणाले. दोन तास चाललेल्या या सत्रात त्यांनी नवनवीन ऍप्स व वेबसाईटचा वापर करून आपली इंग्रजी कशी सुधारायची याची माहिती दिली. त्यानंतर नेपाळ, कोरिया व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी एकमेकांची ओळख करून घेत आपल्या देशाबद्दल माहिती सांगितली.
सोनी या काठमांडूच्या विद्यार्थिनीने आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे त्याबरोबरच तिने भारतातील भटकंतीचे अनुभव सांगितले. रूपा या पोखरा येथील विद्यार्थिनीने आपल्या ब्लॉग लिखानाबद्दल तसेच युजान या काठमांडू येथील कंटेंट रायटरने आपले व्यवसायिक अनुभव सांगितले. सोलापूर येथील सुप्रिया या एमसीए च्या विद्यार्थिनीने आपल्या रायफल शूटिंगच्या आवडीबद्दल सांगितले. तिन्ही देशांमधून एकूण १२० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
अरण्यानंद प्रतिष्ठानच्या सदस्य डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी दर बुधवारी ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या कॅफेची माहिती सर्वांना दिली. या कॅफेचा उद्देश विद्यार्थ्यांना आपली इंग्रजी सुधारण्याची तसेच आत्मविश्वासाने बोलण्याची संधी निर्माण करून देणे हा आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हा कॅफे चालवला जाणार आहे. विविध खेळ, कोडी, आणि उपक्रमातून हसतखेळत इंग्रजी बोलायला लावले जाणार आहे. आकाश गुरुबेहती याने आभार मानले. डॉ मंगेश पाटील, श्री मनोज पाटील, प्रा. सौ. शीतल पाटील यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांना देश विदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याची संधी मिळणार आहे.