नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शुक्रवारी रात्री नागपूरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जुगार आड्ड्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्यानंतर, मृत तरुणाच्या काही मित्रांनी मुख्य आरोपीला त्याच ठिकाणी आणून त्याचीही हत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
स्वयम नगराळे आणि आणि शक्तिमान ऊर्फ शिवम् गुरुदेव अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अजनी परिसरातील कौशल्यानगरात एका जुगार अड्डा आहे. या जुगार अड्ड्यावर मृत स्वयम आणि शक्तीमान यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरू होता. याच वादातून शक्तीमान यानं स्वयमच्या हत्येचा कट रचला. यातून आरोपी शक्तीमान ऊर्फ शिवम् गुरुदेवने आपल्या तीन मित्रांच्या मदतीनं स्वयमचा धारदार शस्त्रानं वार करत खून केला. स्वयमची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले पण मुख्य आरोपी शक्तीमानचा काहीही थांगपत्ता लागला नाही. या दरम्यान स्वयमची हत्या झाल्याचं कळताच, मृत स्वयमच्या काही मित्रांनी आरोपी शक्तीमानचं त्याच्या मामाच्या घरातून अपहरण केलं आणि त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवलं आणि स्वयमची ज्याठिकाणी हत्या झाली होती त्याच ठिकाणी आणलं. त्या ठिकाणी मृत स्वयमच्या मित्रांनी शक्तीमानचीही हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी शक्तीमानच्या तीन मित्रांना अटक केली असून स्वयमच्या मित्रांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.