औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. या उपक्रमाचा फायदा विद्यापीठाला झाला असून ११ देशांतील १०७ विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध विभागांत अध्यापन, संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे.
मध्य-पूर्व अशिया देशातील विदेशी विद्यार्थ्यांचा पूर्वी औरंगाबादेत शिक्षणासाठी मोठा ओढा होता. मात्र मध्यतंरीच्या काळात विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यासंदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना तसेच प्रवेश ते निकालापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय घेतला होता. विदेशी विद्यार्थी कक्षाच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया मोहीम राबविण्यात आली.
२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात एकूण ११ देशांतील १०७ विद्यार्थ्यांनी विविध विभागांत तसेच संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे. यामध्ये येमेनचे ८९, आफगाणिस्ताान १, कांगो १, इराक १, सीरीया १, जॉर्डन १, नेपाळ १, सुदान १, सोमालिया ७, थायलंड २ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, अशी माहिती विदेशी विद्यार्थी कक्षाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली आहे.