सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पाण्याअभावी जावळी तालुक्यातील गावे ओस पडू लागली आहेत. हे चित्र भयावह असून तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण महत्वाचे आहे. शासन या प्रश्नी लक्ष घालत नसून येत्या १५ दिवसात या धरणासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित केली नाही तर ५४ गावातील ग्रामस्थ शेतकरी पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढतील. आणि तरीही शासनाने प्रतिसाद दिला नाही तर मोठे जनआंदोलन उभे केले जाईल,असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने ५४ गावांतील शेतकरी, ग्रामस्थ यांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानंतर डॉ. भारत पाटणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील शेतकरी हा पाण्याविना आहे. तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा असंख्य बैठकीच्या तारखा येथील ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या दालनात बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. बोंडारवाडी धरणाच्या रखडलेल्या प्रश्नामुळे भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आता आक्रमक झाले होते.
महाराष्ट्रात जेवढ्या चळवळी आहेत. त्या चळवळीतील लोक या आमच्या चळवळीला पाठींबा देतील, असा आम्हाला विश्वास आहे. कारण यापूर्वीही अशी आंदोलने आम्ही केलेली आहे. बोंडारवाडीतील पाणी सरकारने आडवी नये. हा काही फार मोठा प्रश्न नाही. फक्त एकच बैठक घेऊन पूर्वीचा झालेला निर्णय पुन्हा घ्यायचा आहे. तसेच त्यात थंडी बदलही करायचे आहेत. या भागाचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी येथील शेतकऱ्यांना जादा पाणी द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.
…तर ५४ गावातील ग्रामस्थ शेतकरी पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढणार ; डॉ. भारत पाटणकरांचा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना इशारा. pic.twitter.com/KB4Upux0CA
— santosh gurav (@santosh29590931) February 5, 2023
बोंडारवाडी धरणातील १ टीएमसी पाणी द्यायला काहीच अडचण नाही. कारण याला अधिकाऱ्यांनीच संमती दिली आहे. १ टीएमसीपैकी .२० टीएमसी आहे ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठी आहे. अधिक .८० म्हणजे १ टीएमसी पाणी होत आहे. हा जुना आकडा असून हे कमी पडत असल्याचे डॉ. पाटणकर यांनी म्हंटले.