कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
कृष्णा फाउंडेशन चे कार्यकारी संचालक व महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. डॉ. विनोद बाबर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वाणिज्य व्यवस्थापन अभ्यास मंडळावर कुलगुरू नामनिर्देशित सदस्यपदी निवड झाली. प्रा. डॉ. विनोद बाबर यशाचा शिवमंत्र च्या माध्यमातून महाराष्ट्रला एक प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत.
शिवाजी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी डॉ. विनोद बाबर यांचे भरीव योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज : द मॅनेजमेंट गुरु हा अभ्यासक्रम प्रथम शिकवणारे शिवाजी विद्यापीठ हे जगातील पहिले विद्यापीठ आहे. त्याचबरोबर डॉ. बाबर हे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ रेठरे बुद्रुकचे प्रधान सल्लागार आहेत. तर असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटस इन महाराष्ट्रचे कार्यकारी सदस्य आहेत. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेवून त्यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
डॉ. विनोद बाबर म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले व कार्यकारी विश्वस्त डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदशाखाली नवीन शैक्षणिक धोरणानुसार ग्रामीण भागातील विघार्थी केंद्रबिंदू मानून त्यांना या जागतिक स्पर्धेच्या युगात पुढे आणण्यासाठी व एक नवीन शैक्षणिक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिंगबर शिर्के, कृष्णा फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अतुल भोसले, विश्वस्त विनायक भोसले, विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, दूरशिक्षण विभागाचे संचालक. डॉ. डी. के. मोरे, डॉ. सारंग भोला, उपकुलसचिव सत्यनारायण माशालकर यांनी डॉ. बाबर यांचे अभिनंदन केले.