हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात डायजेन जेल वापरणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. छातीची जळजळ, पोटाचे विकार, पित्ताच्या त्रासावर डायजेन जेल फायदेशीर ठरते. मात्र या डायजेन जेल वापरण्याविरोधात ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये, रुग्णांना गोव्यात उत्पादित केले जाणारे डायजेन जेल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तर, सर्व घाऊक विक्रेत्यांना डायजेन जेल बॅच क्रमांकांसह काढून टाकण्याची सूचना DCGI ने दिली आहे.
मुख्य म्हणजे, DCGI ने उत्पादन वापरण्याविरुद्ध सल्ला जारी केल्यानंतर अॅबॉट इंडियाने अँटासिड डायजेन जेलच्या अनेक बॅच परत मागवून घेतल्या आहेत. कारण की, गोवा युनिटमध्ये उत्पादित करण्यात आलेले डायजेन जेल असुरक्षित असू शकते. तसेच त्याचे सेवन केल्यानंतर रुग्णांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे अॅबॉट इंडियाचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर, याप्रकरणी सरकारने डॉक्टरांना सल्ला दिला आहे की, त्यांनी रूग्णांना अँटासिड डायजेन औषध लिहून देणे टाळावे.
तर दुसऱ्या बाजूला DCGI च्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, “डायजेन जेल रुग्णाच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रुग्णांनी डायजेन जेलचा वापर बंद करावा. यातून काही त्रास आढळल्यास त्याची तक्रार करावी” मात्र अद्याप, डायजेन जेल वापरल्यामुळे कोणत्याही रुग्णाच्या तब्येतीवर परिणाम झाल्याची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. सध्या डायजेन जेल विरोधात विक्री, वितरण, शिक्कल साठा संदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. जर डायजेन जेलचे नमुने शिल्लक असतील तर त्याची तपासणी करून त्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देश DCGI कडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, गेल्या 11 ऑगस्ट रोजी Abbott India Limited ने गोव्याच्या साइटवर उत्पादित करण्यात आलेले डायजेन जेलचे वितरण उत्पादन परत मागून घेतले होते. त्यानंतर यातील तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे उत्पादन कंपनीने थांबवले होते. कारण गेल्या 9 ऑगस्ट रोजी अँटासिडची चव कडू आणि तिखट लागत असल्याची तक्रार ग्राहकांनी कंपनीकडे नोंदवली होती. त्यानंतरच Abbott कंपनीने ही कारवाई केली होती. परंतु अद्याप डायजेनच्या गोळ्या आणि जेलचा रुग्णांवर काही विपरीत परिणाम झाला असल्याची नोंद कंपनीकडे आलेली नाही.