औरंगाबाद – मागील 15 दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीच्या औरंगाबाद विभागाने प्रवाशांच्या सेवेसाठी औरंगाबाद ते पुणे दरम्यान खासगी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. अशातच पुण्याहून औरंगाबाद दरम्यान मद्यपान केलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने भरधाव बस चालवून 30 प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याची घटना रविवारी घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, पुण्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या शिवशाही बसच्या (एमएच 04 जेके 3157) चालकाने अहमदनगरमध्ये बस थांबवून मद्यपान केले आणि चार प्रवाशांना विनतिकीट बसविले. पुढे घोडेगाव येथे दोन महिला प्रवाशांना बसविले. या महिलांनी बसमधील एका प्रवासी महिलेची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अन्य प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्या महिला नेवासा फाटा येथे उतरल्या. त्यानंतर चालकाने नेवासा फाटा येथे पुन्हा मद्यपान केले.
संपूर्ण प्रवासात चालक वेगाने बस चालवीत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ही बस रात्री 9 वाजता मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. तेव्हा प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आगार व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली. या सगळ्यात चालकाने बसस्थानकातून पळ काढला. याविषयी आम्ही आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.