चचेगाव येथे शाॅर्टसर्किटमुळे तासाभरात 13 एकर ऊस जळून खाक

कराड | तालुक्यातील चचेगाव येथील देशपांडा शिवारात शाॅर्टसर्किटमुळे 13 एकर ऊस जळाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 12 शेतकऱ्यांच्या ऊस जळाला असून लाखो रूपयांचे नुकसान झाले. जळालेल्या शेतातील ऊसाचा पंचनामा तलाठी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चचेगाव गावातील कोळे पाणंद रस्त्यावरील देशपांडा शिवारात  शाॅर्टसर्किटमुळे ऊसाच्या शेताला आग लागली. आग लागल्यानंतर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र ऊस वाळलेला असल्याने आगीने काही क्षणातच राैद्ररूप धारण केले. केवळ तासाभरातच 13 एकरातील ऊस जळाला. त्यामुळे कोणतीही अग्नीशामक बंब येण्याच्या अगोदर ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

चचेगाव येथील विनोद गायकवाड, सुभाष पवार, सहदेव पवार, लालासो पवार, विक्रम पवार, मोहन पवार, दिलीप पवार, अनिल कांबळे, महादेव पवार, साहेबराव पवार, बाजीराव पवार, लक्ष्मण पवार या शेतकऱ्यांचा ऊस जळाला. महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.