औरंगाबाद – वैजापूर शहरातील वसंत क्लबमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या ऑनलाईन बैठकीत तक्रार केल्यावरून वैजापुरातील शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. प्रकरण एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत गेले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम यांनी थेट आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे शिवसेनेतील पक्षांतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधींची बुधवारी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. वैजापुरातील वसंत क्लबमध्ये येत पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीत विषयाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम यांनी पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या. पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावत नाहीत, विश्वासात घेत नाहीत; तालुक्यात पक्षाची परिस्थितीत बिकट झाली आहे. कोणाचाही वचक राहिलेला नाही. अंतर्गत हेवेदावे वाढले असल्याने तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. अशा प्रकारची तक्रार निकम यांनी दानवे यांच्याकडे ऑनलाईन बैठकीत केली. त्यानंतर काही क्षणांतच वादाला सुरुवात झाली.
शिवसेनेतील दोन गटांतील कार्यकर्त्यांची खदखद या निमित्ताने बाहेर पडली. हा वाद इतका विकोपाला गेला की, निकम यांनी शिवीगाळ करून आमदार रमेश बोरनारे यांच्यावर खुर्ची फेकून मारली. त्यामुळे दोन गटांतील पदाधिकारी हाणामारीला उतरले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. निकम यांनी यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांनाही चांगले फैलावर घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.