हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू आणि चॅम्पियन खेळाडू ड्वेन ब्रावो यांनी आयपीएल मधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राव्होच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केले आहे. मागील आठवड्यात मुंबईचा इंडियन्सचा खेळाडू कायरन पोलार्ड यानेही निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईने कोच म्हणून नियुक्त केलं होते.
चेन्नईच्या संघाने यंदाच्या लिलावापूर्वीच ब्राव्होला संघातून रिलीझ केलं होत. त्यांनतर ब्राव्होने आयपीएल ऑक्शन साठी आपलं नावही दिले नाही. त्यामुळे ब्रावो आणि आयपीएलचे नातं तुटणार असं वाटत होते, मात्र चेन्नईने त्याला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केल्यामुळे तो पुन्हा एकदा संघासोबत दिसणार आहे. आपल्याला गोलंदाजांसोबत काम करायला मजा येते आणि मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया ब्राव्होने दिली आहे.
ब्राव्हो हा आयपीएलमधील दिग्गज गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या गोलंदाजीसोबतच स्फोटक फलंदाजीने चेन्नईला अनेक सामने जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ब्राव्होने आयपीएलच्या 161 सामन्यांमध्ये 183 बळी घेतले आहेत आणि 130 च्या स्ट्राइक रेटने 1560 धावाही केल्या आहेत. दोन आयपीएल हंगामात (२०१३ आणि २०१५) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून पर्पल कॅप जिंकणारा ड्वेन ब्राव्हो हा पहिला खेळाडू होता.