मुंबई | ठाणे जिल्हातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात मे 2016 साली नवनाथ ढवळे यांनी व त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला होता. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
नवनाथ ढवळे 2015-2017 या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दल ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2016 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला. उसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. ही चकमक तब्बल 12 तास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.
मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे यांनी गडचिरोली, कराड, चिपळूण याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्ष्यवेधी ठरले आहे.