हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांदोली धारण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप घडला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मागील काही दिवसांपासून सातारा, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे चांदोली धरण जवळपास 82 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून सध्या धरणातून पाणी सोडले जात आहे. आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी पाण्याचा विसर्ग सुर असतांना अचानक धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक नागरिक हे झोपेत असतानाच अचानक भूकंपामुळे जमीन हादरली आणि नागरिकांना जाग आली. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच चालला असून नदी, नाले तुडुंब भरले आहेत. अनेक नद्यांची पाणीपातळीवाढली आहे. असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चांदोली धरणातून पाणी सोडले जात असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज झालेला भूकंप हा सौम्य असल्यामुळे चांदोली धरणाला धोका नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.