सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सलग आठ दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर तासगाव आणि नागेवाडी कारखान्याचे एक कोटी रुपयांचे 29 जानेवारीचे धनादेश ख़ा. संजयकाका पाटील यांनी आंदोलक महिला शेतकर्यांना दिले. उर्वरित बिले 15 ही फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकर्याच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी पत्र ही यावेळी खासदारांनी आंदोलनस्थळी येवून दिले. यानंतर आठ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास खासदार पाटील यांनी शनिवारी भेट दिली. “आमची चूक झालेली आहे, मला ती मान्य आहे, कारखाना आता आर्थिक अडचणीत आहे, कुठूनही पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पैसे देण्यास विलंब झाला. आज मी कोटींची बिले वर्ग करतो तर चार आणि 12 फेब्रुवारीला उर्वरित बिले वर्ग करतो. कुणाचा एक रुपया बुडविणार नाही,”अशी ग्वाही यावेळी खासदार पाटील यांनी दिली. यानंतर खा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते मोर्चातील महिलांच्या पतीना बिलाचे धनादेश देण्यात आले.
यावेळी बोलताना खराडे म्हणाले,”गेली एक वर्ष आमचा लढा सुरू आहे. या लढ्याला यश ही आले. आतापर्यंत तब्बल 30 कोटींची बिले मिळाली. बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेनंतर तरी सर्व पैसे मिळतील ही अपेक्षा होती. मात्र ही फोल ठरली आहे, आतापर्यंत अनेकदा फसव्या तारखा आणि फसवे चेक देऊन दिशाभूल केली आहे. आठ दिवस आंदोलन करून एक कोटी घेणे आंदोलनाचे यश नाही. मी आणि शेतकरी खुश नाही, मात्र आंदोलन किती दिवस चालू ठेवायचे हाही प्रश्न आहे. त्यात कोरोना आणि प्रचंड थंडी, याशिवाय या आंदोलकांच्या जेवणासाठी येणारा खर्च प्रचंड आहे.” खा. संजय पाटील यांनी माझ्याकडे आता पैसेच नाहीत म्हणून हात वर केले आहेत. यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.