दररोज खा एक पान… शरीरात दिसतील ‘हे’ चमत्कारिक बदल

Untitled design (15)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो. काही वेळा महागड्या औषधांवर खर्च करतो, तर काही वेळा डाएट प्लॅन, सप्लिमेंट्स यांचा आधार घेतो. पण नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध अशा काही गोष्टी आपल्या शरीरासाठी अमूल्य ठरू शकतात, हे आपण विसरतो. अशाच काही वनस्पतींच्या पानांचं सेवन केल्यास शरीरात सकारात्मक अन आरोग्यदायी बदल घडतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. हे उपाय आयुर्वेदात शतकानुशतके वापरले जात असून, आता आधुनिक विज्ञानही त्याच्या फायद्यांची पुष्टी करत आहे.

या सात दिवसांच्या आरोग्यदायी आहार पद्धतीमध्ये दररोज वेगवेगळी एक विशिष्ट प्रकारची पाने खाल्ली जातात. यामध्ये तुळस, कढीपत्ता, पुदिना, कडुलिंब, कोथिंबीर, शेवगा आणि पालक यांचा समावेश आहे. ही सात पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे शरीराला विविध प्रकारचे फायदे देतात . मग ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो, पचन सुधारवणे, त्वचेचा नूर वाढवणे किंवा रक्तशुद्धी करणे. चला तर मग, ही सात पाने कोणत्या दिवशी खावीत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सविस्तर जाणून घेऊया.

पहिल्या दिवशी तुळशीची पाने –

तुळस ही भारतीय घरांमध्ये पूजेसाठी वापरण्यात येणारी अत्यंत पवित्र वनस्पती आहे. पण तिचे औषधी उपयोगही तितकेच प्रभावी आहेत. रोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 7 तुळशीची पाने खाल्ल्यास सर्दी-खोकल्यावर नियंत्रण मिळते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला आजारांपासून संरक्षण देतात.

दुसऱ्या दिवशी कढीपत्ता –

कढीपत्ता हा फक्त जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी नसून त्याचे आरोग्यावरही अनमोल फायदे आहेत. या पानांमध्ये जीवनसत्त्व अ, बी, सी आणि लोह असते. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने केस गळणे थांबते, यकृत (लिव्हर) मजबूत होतं आणि चयापचय क्रिया (metabolism) सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील ऊर्जा वाढते.

तिसऱ्या दिवशी पुदिन्याची पाने –

पुदिन्याच्या पानांत थंडावा देणारे आणि पचन सुधारणारे गुण असतात. यामुळे अन्न नीट पचतं, अपचनाचा त्रास कमी होतो आणि पोटातील वायू, गॅस आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. पुदिन्याचा नियमित सेवन तोंडाची दुर्गंधी दूर करतं आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात शरीरात होणारी उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याचा उपयोग विशेषत्वाने केला जातो.

चौथ्या दिवशी कडुलिंबाची पाने –

कडुलिंब ही आपल्या आजूबाजूला सहजपणे आढळणारी पण अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. तिच्या कडवट पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. यामुळे रक्त शुद्ध होतं, त्वचेवरील मुरुमे, डाग, पुरळ दूर होतात आणि त्वचेचा नूर वाढतो. रोज सकाळी काही कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

पाचवा दिवशी कोथिंबीरची पाने –

कोथिंबीर ही फक्त जेवणाची सजावट नसून आरोग्यासाठीही अमूल्य आहे. तिच्या पानांमध्ये जीवनसत्त्व अ, क आणि के भरपूर प्रमाणात असते. ही पाने दृष्टी सुधारतात, साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात आणि शरीरात अँटीऑक्सिडंट्स पुरवतात. कोथिंबीरमध्ये फायबर्स आणि लोहही असतं, जे हृदयासाठी हितकारक असतं.

सहाव्या दिवशी शेवग्याची पाने –

शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ए भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा, थकवा कमी होतो आणि पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते. हि पाने शरीरात इन्फ्लेमेशन कमी करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. महिलांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शेवग्याच्या पानांचं सेवन खूप उपयोगी ठरतं.

सातव्या दिवशी पालकची पाने –

पालक ही लोहाचे उत्तम स्रोत आहे. त्यामुळे रक्त वाढवण्यासाठी अन शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी पालक उपयुक्त आहे. पालकमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचन सुधारते अन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ही पाने थोडीशी उकळून किंवा भाजी स्वरूपात सेवन केल्यास अधिक लाभदायक ठरतात.

ही सात पाने, सात दिवस खाल्ल्यास शरीरात होणारे बदल तुम्हाला स्वतः अनुभवता येतील. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, पचन सुधारणं, त्वचेला तजेलदार बनवणं आणि शरीराला आवश्यक पोषण पुरवणं . हे सर्व फायदे एका साध्या आणि नैसर्गिक पद्धतीने मिळू शकतात. यासाठी कुठलाही खर्च, औषधं किंवा डाएट प्लॅन आवश्यक नाही.