कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
नेहमीच चर्चेत असलेल्या कराड येथील कराड जनता सहकारी बँकेच्या कारभाराची ईडीच्या अधिकाऱ्यांच्यावतीने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जनता बँकेचा परवाना रद्द केला होता.
केवळ चार कर्जदारांच्या मोठ्या कर्जाने बँकेवर दिवाळखोरी लादल्याची आजही भावना आहेत. त्या अनुषंगाने ईडीच्या अधिकाऱ्यांकडूनही त्या चार मोठ्या कर्ज व्यवहारांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आज दिवसभर जनता बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीचे अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. यावेळी त्यांनी बँकेच्या कर्ज व्यवहारांची चौकशी केली. तीन दिवसांपूर्वी अवसायानिक मनोहर माळी यांच्याकडेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीच्या सध्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. तसेच बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी यांची ईडी कार्यालयात तब्बल दहा तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आले आहे.
कराड जनता बँकेच्या बेहिशोबी कर्ज वाटपासह त्याची मंजुरीही ईडीच्या चौकशीच्या कचाट्यात आहे. तसेच संबंधित त्या चार कर्जदारांच्या थकीत कर्जाची रक्कम 500 हून कोटी इतकी आहे. बँकेने संबंधितच वसूल केलेली नाही. तर चारपैकी दोघांना विनातारण बँकेने कर्जे दिल्याने त्या विरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे कर्ज देण्याच्या मर्यादेच्या पालनाच्या नियमांना डावलून कर्ज वाटल्याने ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्याबाबत सहकार खात्यासह कऱ्हाडच्या न्यायालयात बँकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी ३१० कोटींच्या अपहाराची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अपहाराचा गुन्हा दाखल होऊन त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.
त्याच काळात जनता बॅंकेची दिवाळाखोरी जाहीर झाल्याने सर्व व्यवहार चौकशीच्या रडारवर आले होते. ईडीकडेही त्या व्यवहाराच्या चौकशीची तक्रार दाखल झाली. त्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. कराड जनता बॅंकेची स्थापना 1962 ची तर बँक परवाना त्यांना 1986 चा आहे. आतापर्यतच्या टप्प्यात 1990 नंतर होणारा कारभार अधिक चर्चैचा ठरला आहे. संचालक मंडळांच्या कारभाऱ्यांचा बेफीकरपणामुळे कर्जे थकत गेली. मोठ्या कर्जाच्या रक्कम एकाच दमात मंजूरीची पद्धतही बँकेला गोत्यात आणणारी ठरली. त्यामुळे ईडीकडे तक्रार दाखल झाली.
त्यासंदर्भात मोठ्या कर्जांची बोगस कागदपत्रे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज झाले. त्यामुळे अवैध व्यवहार अधोरेखीत झाले. त्यात गैरप्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने ईडीने चौकशी सुरू केली आहे. कराड जनता बँकेच्या चार कर्जदारांची थकीत कर्जे किती? वसुली किती झाली? तारण काय ठेवले आहे? या सर्व गोष्टींची चौकशी होत आहे. उद्योजकांना विनातारण तर कारखानदारांनाही मोठी कर्जे दिली आहे, त्चौया सगळ्याची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडी कार्यलायाकडून काही अधिकारी आज दिवसभर शहरात दाखल झाले होते. त्यांची चौकशी सुरू होती. जनत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही चौकशी सुरू आहे.
ईडीच्या चौकशीबाबत कराड जनता सहकारी बँकेचे अवसायानिक मनोहर माळी म्हणाले की, कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहरांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यानुसार अवसायानिक म्हणून माझ्याकडून ती कर्जे कशी वितरीत केली गेली. यासह त्या व्यवहारांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून घेतली आहे. त्यानुसार त्यांनी व्यापक अहवाल मागविला आहे. तो लवकरच ईडीला देण्यात येणार आहे.