विशेष प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यावेळी ईडी चौकशीसाठी वर्णी लागली आहे ती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची. पटेल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. ईडीच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला पटेल यांची चौकशी होणार आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं ईडीनं त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
याबाबत समोर आलेली सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या एका साथीदाराशी प्रफुल्ल पटेल यांनी आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या दिवंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता, असा आरोप झाला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘मिर्ची’ यांच्यात झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून ‘मिर्ची’ ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव ‘सीजे हाउस’ असे आहे, अशी माहिती समोर आली होती.
या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांत मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. यात छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इक्बाल मेमन म्हणजे ‘मिर्ची’ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, यासंबंधीची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत, अशी माहिती समोर आली होती.