औरंगाबाद : कोरोनाची साथ वाढत असतानाच शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमधील कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस बंद झाला आहे. सध्या केवळ दुसराच डोस दिला जात आहे. त्यामुळे संबंधितांना पहिल्या डोससाठी सरकारी रुग्णालये आणि महापालिकेच्या केंद्रांवर पाठवले जात आहे. लसीच्या तुटवड्यामुळेच खासगी रुग्णालयांतील लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील डझनभर खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या थाटात आणि उत्साहात कोरोनाचे लसीकरण सुरू झाले. मात्र, काही आठवड्यांमध्येच लसीचा तुटवडा जाणवून लसीकरणावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. तुटवड्यामुळेच अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण काही ना काही दिवस थांबले होते. सद्यस्थितीत लसीकरण सुरू असले तरी, अनेक रुग्णालयांमध्ये तुटवड्यामुळे आणि पालिकेच्या सूचनांमुळे पहिला डोस देणे बंद करण्यात आले आहे. या संदर्भात डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे लसीकरण विभागप्रमुख सोपान कदम म्हणाले, ‘आमच्याकडे साधारणतः आठवड्यापासून पहिला डोस बंद करण्यात आला आहे.
ज्यांनी पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच दुसरा डोस दिला जात आहे. युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्येही पहिला डोस बंद करण्यात आला असून, सध्या फक्त कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. पालिकेच्या सूचनेमुळेच हा बदल करण्यात आल्याचे ‘सिग्मा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे यांनी स्पष्ट केले. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्येही पहिला डोस बंद असल्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. हिमांशू गुप्ता यांनी सांगितले. कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सध्या कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस उपलब्ध आहेत; पण कोव्हॅक्सिनचा केवळ दुसराच डोस उपलब्ध असल्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा कौल यांनी सांगितले.
‘घाटी’मध्ये एका दिवसाचाच साठा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्येही (घाटी) कोव्हॅक्सिनचा अवघ्या एका दिवसाचाच लसीचा साठा उपलब्ध आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयातून पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, पुरवठा न झाल्यास लसीकरण खंडित होऊ शकते, असेही सांगण्यात आले. सध्या कोव्हॅक्सिनच्या लसी कमी असल्या तरी, कोव्हिशिल्डचे अकरा हजार डोस उपलब्ध आहेत. नागरिकांनी पालिकेच्या केंद्रांमध्ये पहिला डोस घ्यावा. लवकरच नवीन पुरवठा होण्याची शक्यता असून, त्यानंतर खासगी रुग्णालयांना देण्याचा प्रयत्न असेल, असे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.