कोरोनाविरोधात लढ्यासाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे नव्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. हजारोंनी रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने काही क्षणापुर्वी रवाना झाली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला. यामधून राज्यासाठी ऑक्सिजन आणला जात आहे.

राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावत आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मदत घेण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून आहे. सायंकाळी आठ वाजता ऑक्सिजन एक्सप्रेस कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली. दहा टँकर महाराष्ट्रातून नेले जात आहेत.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरचे टँकर या रेल्वेत ठेवण्यात आलेले आहेत. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जात आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रात्री रवाना झाले तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

याविषयी विचारले असता एका रेल्वे अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्वीड ऑक्सिजनसाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. या दोन्ही राज्यांनी रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजनच्या वाहतुकीबद्दल विचारणा केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने सोमवारपासून (19 एप्रिल) महाराष्ट्रातून ऑक्सिजनचे खुले टँकर्स रेल्वेमार्गाने विजाग, जमशेदपूर, राऊरकेला, बोकारो येथे पोहोचतील. त्यानंतर येथून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेमार्गाने केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, देशात मागील काही दिवसांपासून रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर तसेस ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून अनेक ठिकाणी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. आरोग्य सुविधा अपुरी पडत असल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली तसेच महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशात शनिवारी  तब्बल 1501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 2 लाख 61 हजार कोरोना रुग्णांची नोंद केली गेली.

You might also like