औरंगाबाद | शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने सिटी बस आता टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जात आहेत. सध्या विविध मार्गावर 41 सिटी बसेस धावत आहेत. सोमवार पासून आणखीन 8 सिटी बसेस धावणार असल्याचा निर्णय स्मार्ट सिटी बस विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता एकूण 49 बसेस प्रवासी सेवेत धावणार आहेत.
शहरातील प्रमुख पाच महामार्गांवर 8 जून पासून 16 सिटी बस सुरू करण्यात आल्या त्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने टप्प्याटप्प्याने रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या 41 पर्यंत वाढवली आहे. त्यात आता सोमवारपासून आणखीन 8 बसची भर पडणार आहेत. यामध्ये माळीवाडा येथील नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या मागणीनुसार मार्ग क्रमांक 16 सिडको ते माळीवाडा मार्गे क्रांती चौक, महावीर चौक, नगर नाका, पडेगाव, मिटमिटा, शरणापुर फाटा, दौलताबाद टि-पॉईंट बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
वाळुज गाव व वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या आणि प्रवाशांच्या मागणीनुसार मार्ग क्रमांक 48 सिडको ते वाळूज मार्ग, पुंडलिक नगर, सूतगिरणी चौक, दर्गा, रेल्वे स्टेशन, गोलवाडी फाटा, बजाज तर मार्ग क्रमांक 8 औरंगपुरा ते वाळुज मार्ग, महाविर चौक, नगर नाका, पंढरपुर बस सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि चार वाजेनंतर असलेल्या निर्बंधामुळे मार्ग क्रमांक पाच आणि सात महामार्गावरील बस वेळापत्रकात स्मार्ट सिटी बस विभागाने बदल केला आहे.