औरंगाबाद – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील एका तरुणाने 30 सप्टेंबर रोजी शहरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता त्या आत्महत्येचा उलगडा झाला असून, मानलेल्या बहिणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या किशाेर जाधव यास फसविल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंदविण्यात आला. याप्रकरणी मानलेल्या बहिणीसह इतर आठ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
धुळे जिल्ह्यातील किशोर भटू जाधव हा युवक औरंगाबादेत पाच-सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने 30 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये एकूण आठ जणांची नावे होती. त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला.
किशोरने त्याच्या मुंबईतील मैत्रिणीकडून 7 लाख रुपये घेऊन मानलेली बहीण रंजना (नाव बदललेले) हिस दिले होते. हे पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करीत होती. उलट तिचे मित्र ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा, सचिन केकान, कृष्णा पोलीस, शोएब आणि आर्यन यांच्यासह दोन मुलींनी प्रचंड मानसिक त्रास दिला. त्याच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार करण्याची धमकी देण्यात येत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अमोल साेनवणे करीत आहेत.