सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांसह मित्र व नातेवाईकांची झोप उडाली आहे. काल कराड तालुक्यातील विरवडे येथील आशिष वीर हा मायदेशी परतला आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा अरबुणे (कराड), आशुतोष राजेंद्र भुजबळ, राधिका संजय वाघमारे, सौरभ बाळासाहेब जाधव (काळचौंडी, ता. माण), योगिनी संदीप यादव, सुभाष द्विवेदी (नवीन एमआयडीसी, सातारा), योगेश जयपाल महामुनी (वडूज, ता. खटाव), ओमकार जयसिंग शिंदे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रशिया-युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. कालपासून प्रत्यक्ष युद्धालाच तोंड फुटल्याने पालकवर्गाची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये कोणी असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.