हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आज संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळाने सर्वात महत्त्वाचा निर्णय, एकट्या सिंचन प्रकल्पांवर 14 हजार कोटींचा खर्च करण्याचा घेतला आहे. तर विविध विकास कामांसाठी 45 कोटीं गुंतवण्याची मंजूरी देण्यात आली आहे.
मुख्य म्हणजे, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 59 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जात आहे, त्याचा फायदा दिसून येईल. आज निर्णय घेतलेले प्रामुख्याने जलसंपदा विभागाचे आहेत. सिंचन प्रकल्पांसाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”
कोणत्या विभांगासाठी निधीची तरतूद?
त्याचबरोबर, “सार्वजनिक विभागामध्ये 12 हजार 938 कोटी 85 लाख रुपये, पशू संवर्धन, दुग्ध विकास, मत्स व्यवसायासाठी 3 हजार 318 कोटी 54 लाख, नियोजन 1 हजार 608 कोटी 28 लाख, परिवहनवर 1 हजार 128 कोटी 69 लाख, ग्रामविकासवर 1 हजार 291 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 488 कोटी, महिला आणि बालविकास विभाग 386 कोटींची तरतूद केली असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
इतकेच नव्हे तर, शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगरविकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटीस, पर्यटन 95 कोटी, मदत-पुनर्वसन 88 कोटी, वनविभाग 65 कोटी, महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 विभाग कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी आणि न्याय 3 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीत, नदीजोड प्रकल्प वगळून 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शनि शेवगाव उच्च पातळी बंधारासाठी 285 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच, समुद्रातले पाणी गोदावरी नदीत वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पासाठी 14 हजार 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.