हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही,” असे म्हणत शिंदे यांनी राऊतांवर टीका केली.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “खासदार 20 ते 22 लाख मतांमधून निवडून आलेले आहेत. एक ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकही इकडे तिकडे जाताना खूप विचार करतो. आज याचा विचार करण्याची आवश्यकता आहे,” असा टोला शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
2019 ला शिवसेना-भाजप युतीत निवडणूक एकत्र लढलो होतो, गेल्या महिन्याभरात आम्ही तो निर्णय घेतला. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं, ते आता झालं आहे. आम्ही जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळतोय. आम्ही सगळे निर्णय तातडीनं घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनीसुद्धा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्र सरकारला दिला असल्याचे शिंदे यांनी म्हंटले.