कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज कराडचा दौरा केला जात आहे. त्यांच्या हस्ते आज नवीन प्रशासकीय इमारत, विश्रामगृह, कृषी प्रदर्शन अशा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कराड येथील विमानतळाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतले. “कराडच्या विमानतळाच्या विकासासाठी कराड विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (MADC) हस्तांतर करण्यात येत आहे. शिवाय या विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरू करण्यात येईल,” अशी महत्वाची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कराड विमानतळाच्या विकासासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहेत. येथील विमानतळाचा विकास व्हावा यासाठी हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (MADC) हस्तांतर करण्यात येणार आहे. या ठिकाणी रात्रीच्यावेळी विमान, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी नाईट लँडिंग सुरू करण्याचाही विचार आम्ही करत आहोत. त्या अनुषंगाने तशा सूचनाही एमएडीसीला देण्यात आलेल्या आहेत. त्याचाही आढावा घेतला जाईल,
गेल्या सहा वर्षांपासून कराडच्या विमानतळाचे विस्तारीकरण रखडले आहे. त्याला स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवला जात होता. त्या विमानतळ प्रश्नाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आता गती मिळण्यास सुरुवात होणार आहे.
कराड शहराच्या तसेच विविध विकास कामांसाठी जो काही निधी आहे तो आपण वेळोवेळी देत आलेलो आहे. तरीही आणखी काही विकास निधी लागणार आहे तो दिला जाईल. तो कुठेही कमी पडू दिला जाणार नाही. कराडमधील विमानतळ विस्तारीकरण प्रलंबित आहे. त्याचे विस्तारीकरण MADC यांच्याकडून करण्यात येईल. या ठिकाणी नाईट लँडिंग सुरु केल्यास त्याचा लोकांनाही फायदा घेता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.