हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे नुकतेच अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन देखील घेतले. तसेच रात्री युवा सेनेकडून शरयू नदीच्या काठी त्यांच्याकडून आरतीही केली जाणार आहे. दरम्यान शिवसेने नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत पोहचताच एक मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे अयोध्येत दाखल झाले आहेत. त्याबरोबर मोठ्या संख्येने शिवसैनिकही अयोध्येत आले आहेत. आम्ही सर्व रामल्लाचे दर्शन घेणार आहोत. शिवसैनिकांसाठी उत्तर प्रदेशात भव्य असे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येत दाखल झाल्यानंतर त्यांचे साध्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी मंगळवार सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात लखनऊत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अनिल देसाई आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे.