हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात फडणवीस सरकार असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे शिष्ठमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव घेऊन आलं होत असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर आता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा दावा करत शिंदेंची कोंडी केली आहे. एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेस मध्ये जाणार होते असा खुलासा खैरे यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं आहे असं म्हणत मागे लागले होते. पण तेव्हा ते शक्य झालं नव्हतं. शिंदे यांच्या या प्रयत्नाबाबत शिवसेना पक्षश्रेष्टींना समजलं आणि ते मागे फिरले. याचा अर्थ हे त्यावेळीही गद्दारी करत होते. ते आज म्हणतात की काँग्रेससोबत गेले, पण ते स्वतः काँग्रेसमध्ये जाणार होते. त्याचं काय? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांचं काही खरं नाही, ते कुठेही जाऊ शकतात असं संजय शिरसाट तेव्हा मला बोलले होते अशी माहिती खैरे यांनी दिली. शिवसेना काँग्रेससोबत गेल्यावर एकनाथ शिंदेही मंत्री होते. सगळ्यात मोठं खातं तुमच्याकडे होतं. इतकं असतानाही तुम्ही दोष देताय. तेव्हा ताबडतोब तुम्ही म्हणायला हवं होतं कि काँग्रेसबर येणार नाही, मी बाहेर पडतो.. पण त्यांनी तेव्हा सत्ता भोगली आणि मुख्यमंत्रीपदासाठी, खुर्चीसाठी बंड केलं असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं.