हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे कुटुंबाचे आराध्य दैवत तसेच कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा मंदिरात इथून पुढे तोकडे कपडे घालून कोणालाही जाता येणार नाही. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावले, मुख्य विश्वस्त आणि खासदार सुरेश उर्फ बाल्या मामा म्हात्रे, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, सहाय्यक कोषाध्यक्ष विकास पडवळ आणि विश्वस्त पूजा अशोक पडवळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
एकवीरा देवी मंदिर (Ekvira Devi Temple) ट्रस्टने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, येत्या ७ जुलै पासून सर्व भाविक भक्ताना कडक ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. फक्त बाहेर येणाऱ्या भक्तांनाच नव्हे तर मंदिर परिसरातील दुकानदार आणि स्थानिकांनाही हा नियम लागू होणार आहे. धार्मिक वातावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्रस्टने म्हटले आहे. हा नियम सर्व महिला, पुरुष, तरुण आणि मुलींना बंधनकारक असेल.
कोणते कपडे घालावे? Ekvira Devi Temple
आपले शरीर पूर्णपणे झाकले जाईल अशीच कपडे भाविकांना घालावी लागणार आहेत. महिला भाविकांना साडी, सलवार-कमीज, कुर्ता किंवा इतर पारंपारिक भारतीय पोशाख घालणे आवश्यक असेल. तरुण मुलींनाही अशाच प्रकारचे ड्रेस घालणे बंधनकारक असेल तर पुरुष आणि मुलांना धोती-कुर्ता, पायजमा-कुर्ता, शर्टसह ट्राउझर्स किंवा टी-शर्ट घालणे बंधनकारक आहे. पुरुष आणि मुलांनाही त्यांचे शरिर झाकावे लागणार आहे.
कोणते कपडे घालू नये?
तरुण पुरुष आणि महिलांना शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट, वेस्टर्न आउटफिट्स, मिनी स्कर्ट, रिप्ड जीन्स, हाफ पँट किंवा इतर कोणतेही कपडे घालू नयेत असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. अशा पोशाखात आढळणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारला जाईल. सर्वानाच ड्रेस कोड अनिवार्य असल्याचे ट्रस्टने सांगितले आहे.
दरम्यान, एकवीरा देवी मंदिर (Ekvira Devi Temple) लोणावळ्याजवळील कार्ला गडावर, कार्ला लेण्यांच्या शेजारी आहे. हे मंदिर मुंबईपासून अंदाजे १०० किमी आणि पुण्यापासून ६० किमी अंतरावर आहे. मंदिर डोंगरावर असून त्याठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. देवी एकवीरा ही रेणुका मातेचा अवतार मानली जाते, जी परशुरामाची आई आहे. ती आगरी-कोळी समाजाची कुलदेवता आहे, तसेच चंद्रसेनिया कायस्थ प्रभू आणि दैवज्ञ ब्राह्मणांसह इतर समाजांद्वारेही पूजली जाते. मंदिरात एकवीरा माता आणि जोगेश्वरी देवीच्या मूर्ती आहेत. जोगेश्वरी ही काळ भैरवाची पत्नी मानली जाते, म्हणून ती एकवीराची नणंद आहे. एकवीरा देगवी मंदिर स्वयंभू पाषाण मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे आणि कार्ला लेण्यांमुळे पुरातत्त्वीय दृष्ट्या संरक्षित आहे. खास करून नवरात्री आणि चैत्र-आश्विन महिन्यांतील यात्रांना लाखो भाविक येतात.




