महाबळेश्वर | जावळी (ता. महाबळेश्वर) येथील पती- पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात स्वत:ला जाळून घेतलेल्या व गेली दहा दिवस मुंबई येथील रूग्णालयात मृत्युशी झुंज देत असलेल्या जावलीच्या शांताबाई दगडु कदम (वय- 70) यांचा रविवारी 22 ऑगस्ट रोजी मुंबईच्या रूगणालयात मृत्यु झाला. शांताबाई कदम यांच्या पतीनेही त्याच दिवशी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचाही 15 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असताना मुंबईतील रूग्णालयात मृत्यू झाला होता. अशा प्रकारे वृध्द दाम्पत्यांनी आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार महाबळेश्वर तालुक्यात घडली आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला कुंभरोशी हे गाव आहे. या गावापासुन ३ कि. मी अंतरावर डोंगरात जावळी हे गाव आहे. या गावात राहणारे दगडु नारायण कदम (वय- 76) व त्यांची पत्नी शांताबाई दगडु कदम (वय-70) यांचे दि. 13 आगस्ट रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादातून चिडून पत्नी शांताबाई यांनी स्वतःला पेटवून घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पेटलेल्या अवस्थेत शांताबाई यांनी घरासमोर असलेल्या ओढयात उडी मारली. ओढयाला पाणी होते त्या वहात गेल्या. इकडे पतीने अंधारात त्यांचा शोध सुरू केला पंरतु शांतबाई यांचा शोध लागला नाही. बराच वेळ शोध घेतल्या नंतर दगडु कदम हे निराश होवून घरी परत आले.
आपल्यामुळे आपल्या पत्नीने आत्महत्या केली, याचे दुःख त्यांना झाले व त्यांनी घरातील स्ट्रॉबेरी पिकावर मारण्यासाठी आणलेले किटकनाशक पिवून त्यांनी ही आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती गावात पसरताच अनेकजण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. काही ग्रामस्थांनी दगडु कदम यांनी तात्काळ उपचारासाठी कुंभरोशी येथे आणले तर, काही ग्रामस्थांनी ओढयात उडी घेतलेल्या शांताबाई यांचा शोध सुरू केला. शांताबाई या एका अडचणीच्या ठिकाणी अडकून पडल्या होत्या. त्यातून ग्रामस्थांनी त्यांची सुटका केली व त्यांनाही उपचारासाठी कुंभरोशी येथे आणले.
कुंभरोशी येथील अभय हवालदार व त्यांचे सहकारी बाळासाहेब पार्टे यांनी उभयतांना त्याच अवस्थेत रूग्णवाहीकेतून पोलादपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांचेवर उपचार सुरू केले, परंतु त्या दोघांचीही अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले. मुंबईत उपचार सुरू असताना दगडु सपकाळ यांचे 15 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इकडे शांताबाई या मृत्युशी झुंज देत होत्या. गेली दहा दिवस त्यांची ही झुंज सुरू होती. परंतु दुर्दैवाने ही झुंज अपयशी ठरली व त्यांचा 22 ऑगस्ट रोजी मुंबई येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. महाबळेश्वर पोलिस हे तपासासाठी जावळी गावात पोहोचू शकत नसल्याने हे प्रकरण पोलादपुर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे.