सातारा | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या कारभारांच्या निवडीसाठी 7 ऑगस्टला मतदान, तर 8 ऑगस्टला निकाल लागणार आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना आज अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
बाजार समितीसाठी 6 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांना 12 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येतील. मंगळवार 13 जुलै रोजी सकाळी 11 पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अजांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल. बुधवार 14 जुलैला सकाळी 11 वाजल्यापासून 28 जुलै दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येतील.
त्यानंतर 29 जुलैला सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास सात ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. आठ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.