हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठका सुरू असतानाच निवडणूक आयोगाने एक मोठे पाऊले चालले आहे. निवडणूक आयोगाकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावली आहे. ही कारवाई या दोन्ही नेत्यांनी प्रचार सभेदरम्यान केलेल्या काही वक्तव्यांमुळे करण्यात आली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने 29 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही पक्षांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
नोटीस बजावण्याचे कारण
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते विविध ठिकाणी सभा घेत आहेत. परंतु आता या सभांमध्ये केलेल्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. तसेच, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याकडून कथित आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे ही दोन्ही पक्षांना नोटीस बजावण्याची कारवाई आयोगाकडून करण्यात आली आहे. खरे तर भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर धर्म, जाती, समुदाय, भाषा या आधारावर द्वेष आणि विभाजन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत आयोगाने कठोर पाऊल उचलले आहे.
त्याचबरोबर, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवार, स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. खरे तर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला होता. हाच आरोप बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षावर कारवाई करत याप्रकरणी उत्तर मागितले आहे.
दरम्यान, एका सभेमध्ये बोलताना, “काँग्रेसच सरकार सत्तेवर आल्यानंतर ते देशाची संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाटू शकतात” असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे तामिळनाडूत भाषेच्या आधारावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हा आरोप भाजपने केला होता.