दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तिरंगी होणार हे निश्चित झाले असून 17 जागांसाठी 53 जण रिंगणात उतरले आहेत. आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर अनिल देसाई गट व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अशी आघाडी झाली आहे.
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये 17 उमेदवार निवडून द्यावयाचे असून सर्वसाधारण सोसायटी मतदार संघातून 7 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीव मधील 2 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागास प्रवर्गातून 1 जागेसाठी 3 अर्ज दाखल आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती मधून 1 जागेसाठी 3 अर्ज दाखल आहेत. अशा पद्धतीने सोसायटी मतदार संघातील 11 जागेसाठी उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण गटातील 2 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 जागा असून त्यासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी मतदार संघातील 2 जागांसाठी 6 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
बाजार समितीच्या 17 जागांसाठी एकूण 53 उमेदवार रिंगणात असून यापैकी 2 उमेदवार अपक्ष आहेत. गुरुवार दि. 29 रोजी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच 8 ऑगस्ट रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे.