औरंगाबाद – बहुप्रतिक्षित मनमाड ते मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मनमाड (अंकाई) ते रोटेगावदरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर काल सायंकाळी इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावले. हा क्षण पाहणे रेल्वे प्रवाशांसाठी आनंददायी ठरला. आता पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन धावेल. त्यामुळे रेल्वेचा प्रवास गतिमान होण्यास मदत होईल.
मनमाड (अंकाई) ते रोटेगाव मार्गावर आज 26 मार्च रोजी सुरक्षा आणि गतीची रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत चाचणी होणार आहे. त्यानंतर झालेल्या कामावर शिक्कामोर्तब होईल. पुढील टप्प्यात औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. हे काम पूर्ण होताच, मनमाड ते औरंगाबाद मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावेल.
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक इंजिनवर रेल्वे धावण्यासाठी औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यासाठी किमान डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.