धक्कादायक! पुण्यात दूध डेअरी मालकासह ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातील हडपसर येथे एका प्रसिद्ध दूध डेअरीच्या मालकासह तेथील ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे मगरपट्टा व हडपसर परिसरात एकच खळबळ पसरली आहे. सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. मागील ४ दिवसांपासून संबंधित डेअरीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानं डेअरीच्या मालकासह ११ जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा रिपोर्ट आला असून डेअरीच्या मालकासह ११ जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

एका डेअरी मालकासह ११ जणांना कोरोना झाल्याच्या वृत्तास हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी दुजोरा दिला आहे. ‘सकाळपासूनच डेअरीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यापैकी कुठल्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची तपासणी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

या डेअरीमधून जवळील सोसायटीच्या ज्या नागरिकांनी दूध, लस्सी ,समोसे व स्वीटचे पदार्थ खरेदी केलेले आहे, त्या सर्वांची महापालिकेच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील ही डेअरी सुरू होती. या डेअरीतून अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व स्वीट अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या डेअरीतील कर्मचाऱ्यांशी संपर्क आलेल्या नागरिकांची शोध घेणं हे महापालिकापुढचं मोठं आव्हान आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.