मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला एल्फिन्स्टन ब्रिज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवताच, अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात आलेल्या या पुलाचे पाडकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, सोमवारपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिकांचं आंदोलन आणि आमदारांचा हस्तक्षेप
ब्रिज बंद केल्यानंतर संतप्त झालेल्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं. “आधी पुनर्वसन, मगच पाडकाम,” अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी आपली मागणी मांडली. आंदोलनाची दखल घेत आमदार कालिदास कोळंबकर यांनी घटनास्थळी हजेरी लावली आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक व अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर, पाडकाम तात्काळ स्थगित करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सोमवारी निर्णायक बैठक
रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत आणि पर्यायी सोयींबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांचे लक्ष आता या बैठकीकडे लागले आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
एल्फिन्स्टन ब्रिज बंद असताना प्रवाशांसाठी खालील पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत:
- दादर पूर्व ते पश्चिम व मार्केटकडे जाण्यासाठी: टिळक ब्रीज
- परळ पूर्व ते प्रभादेवी/लोअर परळ: करी रोड ब्रीज
- भायखळा, परळ पूर्व ते वरळी/कोस्टल रोड: चिंचपोकळी ब्रीज
- प्रभादेवी व लोअर परळ पश्चिम ते टाटा/केईएम रुग्णालय: दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत करी रोड ब्रीज
नागरिकांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला निर्णय मागे घ्यावा लागला आणि मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ याची दखल घेतल्यामुळे एल्फिन्स्टन ब्रिजचा पाडाव तूर्तास टळला आहे. आता सोमवारच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे – काय तोडगा निघतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.




