पाचगणी नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्याचं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात स्वच्छतेत नावलौकिक असलेली नगरपालिका म्हणून पाचगणी नगरपालिकेचा बोलबाला आहे. पाचगणी हे पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहेच. मात्र या ठिकाणच्या काही लोकांमध्ये असलेला अंगभूत आगावपणा काही कमी होताना दिसत नाही. नव्याने मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेल्या गिरीश दापकेकर यांना सर्वसामान्य जनतेच्या कामांचा निपटारा करण्याचं आव्हान असताना नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून त्यांना गाफील ठेवून आणखी अडचणी वाढवण्याचं काम केलं जात आहे.

ब्रिटिशांच्या इतिहासाशी नातं असणारं जगातील दोन नंबरचं पठार म्हणून पाचगणीची ओळख आहे. पाचगणीत भाडेपट्टा मालमत्ता, ऐतिहासिक मालमत्ता, तसेच उच्चभ्रू सेलिब्रिटींच्या भरपूर मालमत्ता आहेत. पाचगणीत भाडेपट्टा मालमत्तेमध्ये अमर्याद भ्रष्टाचार झाल्याची चर्चा वारंवार होत असते. पाचगणी नगरपालिकेकडे भाडेपट्टा मालमत्ता व अनधिकृत बांधकामाबाबत शेकडो तक्रारींचं घोंगडं भिजत पडलं असून याला सर्वस्वी जबाबदार पालिकेतील कर्मचारी आहेत. कोणत्याही कामाचा कागद अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू न देण्याचं काम हे लोक इमान इतबारे करतात. तक्रारीवर बाहेरच्या बाहेर थातुर मातुर उत्तरं देवुन तक्रारदाराची बोळवण केली जात आहे. नूतन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी नगरपालीकेतील अशा झारीतील शुक्राचार्यांना शोधून दप्तर दिरंगाई कायद्यानुसारच वागायची शिस्त लावायला हवी.

पाचगणीतील पदाधिकारी लोक “हम यहा के सरकार है “ अशा प्रकारचा आविर्भाव आणून वागत असतात. पदाधिकारी आणि कनिष्ठ लोक कायदा वाकवून काम करुन घेतात आणि मुख्याधिकारी, संबंधित टेबलचा कर्मचारी मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. गंगाजल हा हिंदी चित्रपटाप्रमाणे कायद्याचं राज्य निर्माण करणारा व सर्वसामान्य लोकांना पिळवणुकीतुन वाचवणारा अधिकारी पाचगणीला हवा आहे. अशा खमक्या अधिकाऱ्याने “नव्या नवरीचे नऊ दिवस “झाले की पुन्हा ताटाखालचं मांजर न होता सर्वसामान्य जनतेकरिता जलद कामाचा निपटारा केल्यावरच जनता डोक्यावर घेईल हे मात्र निश्चित. पाचगणी नगरपालिकेतील कर्मचारी, ठेकेदार, पदाधिकारी यांनी तयार केलेला चक्रव्ह्यूव गिरीश दापकेकर कसा भेदतायत हे आगामी काळच ठरवेल.

Leave a Comment