औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, बस, दुकाने तसेच व्यवसाय देखील बंद आहे. यामुळे व्यावसायिकांवर आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे तणावात एका 35 वर्षीय व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कृष्णा नारायण खंबाट असे या मयत व्यक्तीचे नाव असून ते पैठण रस्त्यावरील नक्षत्रवाडी येथे पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह भाड्याच्या घरात वस्तीस राहत होते. काही वर्षापूर्वी पुण्याला खासगी नोकरी करणाऱ्या कृष्णा यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले होते. कृष्णा यांनी त्यांच्या मित्रासोबत मिळून एका ओळखीच्या व्यक्तीच्या जमिनीवर व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या वर्षांमध्ये कंपनी लॉसमध्ये आली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या काळात आर्थिक तणाव निर्माण झाल्यामूळे ते चिंतेत होते.
शनिवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी व मुलगी माहेरी गेले होते. त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी लक्ष्मण इथापे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.