भास्कर जाधव, हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; मनसेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर मनसेने जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

नेमकं काय घडलं-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण च्या बाजारपेठ मध्ये पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेले असता एका महिलेने उद्धव ठाकरेंना मदत मागितली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.