कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
चार दिवसांपूर्वी पाटण तालुक्यातील हेळवाक येथे बिबट्या घरात शिरल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज मध्यरात्री साडेबारा वाजता पाटण शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात डांबरी रस्त्यावर बिबट्याचे वाहनचालकांना दर्शन झाले. यावेळी चारचाकी गाडीच्या लाईटमुळे बिबट्याची अवस्था भाग…भाग…भाग अशी झाली होती.
पाटण शहरात भरवस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डांबरी रस्त्यावरून पळताना या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. गाडीच्या लाईटच्या प्रकाशामुळे हा बिबट्या सैरावैरा धावू लागला होता. बिबट्या वाट शोधत लपण्यासाठी जागा शोधत होता. त्याचवेळी गाडीचालकही बिबट्याच्या भीतीने एकाच जागेवर काहीकाळ स्तब्ध होते. परंतु या परिस्थितीत या गाडी चालकांनी बिबट्याची हालचाल मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
पाटण शहरात बिबट्याची एन्ट्री… पण गाडीच्या लाईटमुळे बिबट्याची अवस्था भाग…भाग…भाग@HelloMaharashtr pic.twitter.com/oPK3cgVYxg
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) October 10, 2022
आता पाटण शहरातील मुख्य डांबरी रस्त्यावरून हा पाहणारा बिबट्या वयाने मोठा असल्याचे दिसत आहे. पाटण खोऱ्यात अनेक ठिकाणी बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर बिबट्या मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. अशावेळी वन विभागाने ठोस उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांच्यातून जोर धरू लागली आहे. बिबट्या पाटण ग्रामीण रूग्णालय परिसरात आल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच, तात्काळ वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरा सुरू झालेली बिबट्याला शोध मोहिम पहाटेपर्यंत सुरू होती.