हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात शिवाजीराव आढळराव पाटील( Shivajirao Adhalarao Patil) यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना शिरूर मतदारसंघामधून (Shirur) तिकीट मिळणे निश्चित झाले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून उभे राहिल्यानंतर अजित पवार गटविरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळेल. कारण की, शरद पवार गटाकडून शिरूरमध्ये अजित कोल्हे उभे राहणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे याचा तोटा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आज आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासह शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी देखील घड्याळ हाती बांधले आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत आल्यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखीन वाढली आहे. तसेच शिरूर मतदारसंघातील जागावाटपाचा तिढाही सुटला आहे. त्यामुळे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाटील विरूद्ध अमोल कोल्हे अशी लढत पाहिला मिळणार आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीबरोबर महायुतीमध्ये देखील जागावाटपासंदर्भात घडामोडी घडताना दिसत आहे. आजच पुण्यामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्येच रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना उभे करण्यावर एकमत झाले. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पहिले तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. यामध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार, रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे आणि शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा समावेश आहे.