हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पीएफचा फायदा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आल्या. आता पीएफ (Provident Fund) काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) नवे डिजिटल तंत्रज्ञान आणत आहे. या बदलामुळे कर्मचारी आणि इतर खातेदारांना आपला PF सोप्या पद्धतीने काढता येणार आहे. EPFO 3.0 या नावाने केंद्र सरकारने ही अत्याधुनिक प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या सुविधेमुळे ऑगस्ट 2025 पर्यंत एटीएम आणि युपीआय अॅपच्या माध्यमातून PF रक्कम सहज मिळण्याची शक्यता आहे.
EPFO 3.0 म्हणजे काय?
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी EPFO 3.0 या नव्या प्रणालीची घोषणा केली आहे. या अंतर्गत EPFO सदस्यांना लवकरच विशेष एटीएम कार्ड दिले जाणार आहे. ज्याच्या मदतीने ते आपल्या PF खात्यातून थेट पैसे काढू शकतील. यासोबतच युपीआय अॅप्स जसे की PhonePe, Google Pay आणि Paytm यांवर “EPFO Withdrawal” हा नवीन पर्याय दिसणार आहे. या पर्यायाच्या माध्यमातून पीएफ रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित करता येईल.
UPI आणि ATM सुविधा कधी सुरू होणार?
EPFO ने या बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी यावर्षी जानेवारी महिन्यातच तयारी सुरू केली आहे. येत्या २ ते ३ महिन्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. थोडक्यात, मे-जून 2025 पर्यंत एटीएम आणि युपीआयच्या मदतीने पीएफ रक्कम काढण्याची सोय उपलब्ध होईल.
किती पैसे काढता येतील?
या सुविधेअंतर्गत EPFO सदस्य आपल्या पीएफ खात्यातील जमा रकमेपैकी ५० टक्के रक्कम थेट एटीएम किंवा युपीआय अॅपच्या माध्यमातून काढू शकतील. यामुळे पीएफ काढण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि काही मिनिटांतच पैसे खात्यात ट्रान्सफर होऊ शकतील.
नवीन डिजिटल प्रक्रियेचे फायदे
यापूर्वी पारंपरिक पद्धतीत पीएफ काढण्यासाठी अनेक दिवस लागत होते, पण आता काही मिनिटांतच ही रक्कम मिळणार आहे.
यासाठी अतिरिक्त कागदपत्रे किंवा अर्ज करण्याची गरज नाही.
PF खातेधारकांना EPFO द्वारे दिले जाणारे विशेष कार्ड वापरून एटीएममधून पैसे काढता येणार आहे.
या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना अधिक सोपे आणि सुटसुटीत अनुभव मिळणार आहेत.
दरम्यान, EPFO 3.0 ही योजना लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि खातेदारांना आर्थिक गरजांसाठी PF काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्वरित निधी मिळवण्याचा लाभ घेता येईल. त्यामुळे EPFO ने केलेला हा बदल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.