गुड न्यूज! कोरोनामुळं नोकरी गमावलेल्यांना केंद्र सरकार देणार बेरोजगारी भत्ता, जाणून घ्या नियम व अटी

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने हजारो कामगारांनी नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार महिन्यात कोरोना व्हायरसमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ESIC) अंतर्गत अशा लोकांना बेरोजगार भत्ता मिळणार आहे. कोरोना काळात ज्यांची नोकरी गेली त्यांना बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा ५० टक्के पगार दिला जाणार आहे.

केवळ अशांनाच मिळणार योजनेचा लाभ
केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या एका ताज्या नियमानुसार, ज्यांची नोकरी २४ मार्च ते ३१ डिसेंबर या काळात गेली आहे किंवा जाणार फक्त अशा लोकांना बेरोजगार भत्ता मिळणार आहे. जे कर्मचारी कर्मचारी राज्य विमा महामंडळा (ESIC)नुसार नोंदणीकृत आहेत. फक्त अशांनाच याचा लाभ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना फायदा देण्यासाठी अटल विमा कल्याण योजनेचा कालावधी ESICकडून वाढवण्यात आला असून तो ३० जून २०२१ करण्यात आला आहे. या कल्याण योजने अंतर्गत बेरोजगारी भत्ता मिळणार आहे. या योजनेचा लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे जे ESIC योजनेत गेल्या २ वर्षापासून आहेत. याचा अर्थ जे कर्मचारी १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत या योजनेत सहभागी झाले आहेत त्यांना याचा फायदा मिळेल. या काळात १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या दरम्यान त्यांनी कमीत कमी ७८ दिवस काम करणे आवश्यक आहे.

९० दिवसापर्यंत या भत्त्याचा घेता येईल फायदा
कोरोना काळात रोजगार गेलेल्या व्यक्तीला ९० दिवसापर्यंत या भत्त्याचा फायदा घेता येईल. संबंधित व्यक्ती तीन महिन्यांपर्यंत सरासरी पगाराच्या ५० टक्के इतकी रक्कम क्लेम करू शकते. ही मर्यादा याआधी २५ टक्के इतकी होती. या योजनेतील आणखी एक नियम बदलण्यात आला आहे. आधी काम गेल्यापासून ९० दिवसानंतर योजनेचा फायदा घेता येत असे. आता तो कमी करून ३० दिवस इतका करण्यात आलाय. याचा अर्थ नोकरी केल्यापासून ३० दिवसानंतर भता मिळण्यासाठी क्लेम करता येईल.

३५ लाख कर्मचाऱ्यांना होईल योजनेचा फायदा
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे इडस्ट्रियल वर्कर्स यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात आर्थिक घडामोडी ठप्प होत्या. अनेकांचे रोजगार गेले आणि नोकरी वाचली त्यांच्यावर ती जाण्याचा धोका आहे. ESICचे सदस्य असलेले व्ही राधाकृष्ण यांनी सांगितले की याचा फायदा ३५ लाख कर्मचाऱ्यांना होईल. ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न कमी आणि मर्यादीत असते अशांसाठी ESIC योजना आहे. यात ज्या कारखान्यात १० पेक्षा अधिक कामगार असतात त्यांना ही योजना लागू होते. पगार जर २१ हजारापर्यंत असेल तर ESICसाठी पात्र ठरवले जाते. ESICनुसार देशात ३.५ कोटी कुटुंब यात सहभागी आहे. यामुळे १३.५ कोटी लोकांना रोख रक्कम आणि वैद्यकीय सुविधा मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”