कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
रयत सहकारी साखर कारखान्यास अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने चालवताना कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास संपादन करण्यात यश आला. या जोरावर पुढील गळीत हंगामा पासून रयत कारखान्यात गाळप क्षमता विस्तारणीकरणा बरोबर वीज, इथेनॉल, आसवणी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी बोलताना दिली.
शेवाळेवाडी- म्हासोली (ता.कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी -रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, शामराव पतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील, प्रा.धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण, सभेस कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोन्द्रे, विजया माने, माजी सभापती प्रदीप पाटील, किसनराव जाधव कारखान्याचे सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक काकाचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहेत. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली 50 वर्षे काकांनी सहकार, समाजकारण,
राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखाना सारख्या संस्था उभारल्या. रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडावा, यासाठी त्यांनी अथणी कारखान्या बरोबर करार केला, त्यास यश येऊन आज रयत शासकीय देणे वगळता पूर्ण कर्जमुक्त झाला आहे. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने येत्या हंगामापासून गाळप क्षमता विस्तारीकरण, वीज प्रकल्प उभारणी होणार आहे. रयत बीओटी तत्वावर इथेनॉल व आसवणी प्रकल्प कार्यन्वित करणेसाठी प्रयत्नशील आहे.
रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने 5 लाख 60 हजार मे टन गाळप करून गाळपास आलेल्या उसास तालुक्यात उच्चाकीं असा प्रति टन 2995 एक रक्कमी भाव दिला आहे. यावर्षी 6 लाख मे टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट असून त्यास सभासद, शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.प्रारंभी संस्थापक स्व. विलासराव पाटील (काका) यांचे स्मृतीस श्रद्धांजली वाहणेत आली. सभेत विषय पत्रिकेचे वाचन शैलेश देशमुख यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करणेत आले. यामध्ये पोटनियम दुरुस्तीस ही मंजुरी देऊन शासनाच्या नियमानुसार शेअर्स रक्कम 15000 करणेस आली. तर बी ओ टी तत्वावर इथेनॉल, आसवणी प्रकल्प उभारण्यासही मान्यता देण्यात आली. प्रास्ताविक संचालक प्रदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. आभार संचालक ऍड. शंकरराव लोकरे यांनी मानले.