हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात असा एकही साखर कारखाना नसावा जिथे इथेनॉलचे उत्पादन होणार नाही असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलं आहे. आज पुण्यात अमित शाह यांच्या हस्ते बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी वरील आदेश दिले. तसेच पैशाची चिंता करू नका. सहकारासाठी विविध योजनांतर्गत मोठा निधी उपलब्ध आहे असेही अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे. आपल्याकडे सहकारासाठी विविध योजनांतर्गत मोठा निधी उपलब्ध आहे, ज्याचा वापर डिस्टिलरी उभारण्यासाठी केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रात असा एकही साखर कारखाना नसावा जो इथेनॉल तयार करत नाही. राज्य सरकारने यासाठी पावलं उचलावीत. त्याबाबतच्या सूचना आपण दिल्या असल्याचेही अमित शाह यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, आधुनिकीकरण, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाशिवाय सहकार क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. देशाच्या सहकारामध्ये जे बदल होत आहेत त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्र्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.
अजितदादांना कोपरखळी –
यावेळी त्यांनी अजित पवार यांनाही कोपरखळी लगावली. आज प्रथमच मी आणि अजित पवार एकाच मंचावर आहोत. पण दादा, तुम्ही खूप काळानंतर योग्य जागेवर बसला आहात असं अमित शाह म्हणाले. तुमची हीच जागा योग्य होती. मात्र आपण खूप उशीर केला असं अमित शाह यांनी म्हणताच अजित दादानी २ हात जोडून स्टेजवरच नमस्कार केला. दरम्यान, आजच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते